सहल : अदृश्य हाताची पकड..
©® लेखक: रूद्रदमन
8265077252
आज जी घटना मी सांगणार आहे…
ती माझ्या आयुष्यातील अशी आठवण आहे, जी आठवली की आजही मनाच्या तळाशी कुठेतरी थंडगार लहर उठते...
तेव्हा मी नववीत होते. पहिल्यांदाच शाळेची सहल जाणार अशी घोषणा झाली आणि जणू संपूर्ण वर्गात आनंदाचे तुफानच आले! त्यानंतर सहलीच्या दिवसा पर्यंत डोळ्याला डोळा लागला नाही. कधी एकदा ती पहाट उजाडते आणि कधी मी बॅग घेऊन घराबाहेर पडते, असे झाले होते..
त्या दिवशी..
पहाटेचे चार वाजले होते... आसमंतात दाट धुक्याची चादर पसरलेली होती, जणू निसर्गाने पांढरेशुभ्र मखमली पांघरूण ओढले होते... कडाक्याची थंडी असूनही आमच्या उत्साहाचा पारा मात्र चढलेला होता... आम्ही शाळेच्या पटांगणात पोहोचलो तेव्हा धुक्यातून केवळ टॉर्चचे प्रकाशझोत इकडून तिकडे फिरताना दिसत होते... थंडी इतकी होती की, बोलताना तोंडावाटे येणारी वाफ पाहून आम्ही मुले एकमेकांवर धुराच्या फुंकरी मारत होतो...
तो खेळ, तो निरागस हसण्याचा आवाज आजही माझ्या कानात घुमतोय...
आम्ही शाळेच्या प्रांगणात पोहोचण्याच्या अगोदरच मैदानावर महाराष्ट्र शासनाच्या दोन दिमाखदार लाल-पिवळ्या एसटी बसेस उभ्या होत्या... ज्याला आपण प्रेमाने लालपरी म्हणतो. काळोखात त्या बसचे दिवे चमकत होते...
शिक्षक आणि शिक्षिकांनी आम्हाला ग्रुप नुसार बस मध्ये बसवले..
बरोबर पाच वाजता, ड्रायव्हर काकांनी चावी फिरवली आणि शांततेचा भंग करत इंजिनचा तो परिचित घरघर आवाज घुमला...
त्या आवाजाबरोबरच आमची काळजाची धडधडही वाढली!
सोबत बॅगांचा लवाजमा, आईने दिलेले आवडीचे खाऊचे डबे आणि संगतीला जिवलग मित्र-मैत्रिणी... बसने वेग धरला आणि खिडकीतून येणाऱ्या थंड वाऱ्याच्या झुळकीने जणू साद घातली, "चला, एका स्वप्नवत प्रवासाला सुरुवात करूया!"
आई-वडिलांच्या मायेचे पंख सोडून मी पहिल्यांदाच अशी घराबाहेर पडत होते... बस निघाल्यावर खिडकीतून बाहेर बघताना, धुक्यात पुसटसे होत चाललेले आई-बाबांचे चेहरे पाहून मन पार खट्टू झाले... निरोप देण्यासाठी हलणारा त्यांचा हात दिसेनासा झाला आणि माझ्या डोळ्यांच्या कडा कधी पाणावल्या हे कळलेच नाही... गळ्यात एक दाट हुंदका अडकला होता...
पण म्हणतात ना, बालपण हे दुःखाला फार काळ टिकू देत नाही... थोड्याच वेळात बसमध्ये ओरडाओरडा सुरू झाला... कुणीतरी गाण्यांची पहिली भेंडी घातली, कुणीतरी मोठ्याने शिट्टी वाजवली, तर कुठे चिप्सच्या पाकिटांचा तो 'कर्र-कुर्र' आवाज केला... त्या गोंगाटात आणि मित्र-मैत्रिणींच्या खळाळून हसण्यात माझे ते नैराश्य कापूर हवेत विरघळावा तसे विरघळून गेले... मी सुद्धा माझे अश्रू पुसले आणि त्या मस्तीच्या प्रवाहात स्वतःला झोकून दिले होते..
सकाळचे साधारण ९ वाजले असतील आणि आमची लालपरी वळणावळणाचा घाट चढून महाबळेश्वरच्या माथ्यावर पोहोचली.. बस थांबली आणि जसा दरवाजा उघडला, तसा गारव्याचा एक झोत लहरीप्रमाणे आत आला... त्या थंडगार वाऱ्याच्या झुळुकीने जणू आमचे प्रेमळ स्वागत केले होते... बसमधून खाली उतरताच समोरचे दृश्य पाहून क्षणभर श्वास रोखला गेला...
असे वाटले जणू आपण जमिनीवर नसून पृथ्वीवरच्या स्वर्गात पाऊल ठेवले आहे..
डोळ्यांच्या टप्प्यात मावेल तितकी हिरवीगार झाडी आणि त्यातून डोकावणारे धुक्याचे लोट!
समोरच वेण्णा लेकचा अथांग पाणीसाठा सूर्याच्या कोवळ्या प्रकाशात हिऱ्यासारखा चमकत होता... लाटांवर स्वार झालेले ते निळेभोर पाणी आणि काठावर उभे असलेले उंचच उंच वृक्ष... हे सर्व पाहताना मन हरखून गेले... धुक्यात अर्धे अधिक हरवलेले ते डोंगर पाहून असे वाटत होते की, ते डोंगर आभाळाशी काहीतरी गुपिते बोलत आहेत...
बराच वेळ आम्ही सर्व मैत्रिणी मनसोक्त बागडलो..
तसे महाबळेश्वरला आलो आणि तिथल्या लालचुटूक स्ट्रॉबेरीचा आस्वाद घेतला नाही तर नवलच! शिक्षकांनी आमच्या साठी आणलेल्या त्या रसाळ आणि आंबट-गोड स्ट्रॉबेरीवर सर्वांनी यथेच्छ ताव मारला..
त्यानंतर तिथे थोडाफार नाश्ता करून आम्ही पुन्हा बसमध्ये चढलो... आता वातावरणात एक वेगळीच गंभीरता आणि ओढ होती... कारण आमची बस आता निसर्गाच्या कुशीतून निघून एका ऐतिहासिक पराक्रमाच्या साक्षीदाराकडे अर्थात... आपल्या राजांचा इतिहास बुलंद करणाऱ्या...
'किल्ले प्रतापगडा'
कडे झेपावणार होती... इंजिन पुन्हा धडाडले आणि आमचा प्रवास एका रोमांचक इतिहासाच्या दिशेने सुरू झाला!
सह्याद्रीच्या कुशीत दिमाखात उभा असलेला हा किल्ला म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची जिवंत साक्षच... जसजशी आमची बस गडाच्या दिशेने जाऊ लागली, तसतसे आजूबाजूचे जंगल अधिकच गडद होऊ लागले...
आमचे लक्ष मात्र बाहेरील निसर्गात कमी आणि शिक्षकांच्या बोलण्याकडे जास्त होते..
कारण,
शिक्षकांनी आम्हाला अफझलखानाच्या वधाची गोष्ट सांगायला सुरुवात केली होती... तो इतिहास पुन्हा ऐकताना अंगावर काटा येत होता...
वेळेचे भानच राहिले नव्हते.. आम्ही प्रतापगडाच्या पायथ्याशी पोहोचलो...
आम्ही सर्व मुलांनी,
"छत्रपती शिवाजी महाराज की जय"
घोषणा देत गडावर चढायला सुरुवात केल्यावर सगळीकडे उत्साहाचे वातावरण पसरले....
प्रतापगड म्हणजे केवळ एक दगडी बांधकाम नाही, तर तो एक जिवंत इतिहास आहे, हे त्या गडाच्या भव्य प्रवेशद्वाराकडे बघूनच जाणवत होते...
पायऱ्या चढताना रस्त्यात खोडकर माकडे भेटत होती. काही मुले घाबरून पळत होती, तर काही त्यांना बिस्किटे दाखवून चिडवत होती.....
साधारण दोन तास आम्ही गडावर होतो... भवानी मातेचे दर्शन घेतले, ती कडेलोट ची जागा पाहिली... गडावर असलेल्या एका छोट्या पाला सारख्या हॉटेल मध्ये आम्ही सर्वांनी पिठले भाकरीवर ताव मारला.. आणि त्यानंतर महाराजांच्या पराक्रमाच्या गप्पा मारत पुन्हा पायथ्याला आलो...
आता दिवस मावळतीला लागला होता... आमची बस मुक्कामाच्या जागेकडे निघाली... ते ठिकाण प्रतापगडापासून साधारण ४८ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात होते... आम्हाला दुसऱ्या दिवशी पहाटेच तिथून जंजिरा किल्ला आणि समुद्र बघण्यासाठी मुरूड च्या दिशेने निघायचे होते... प्रवास थकवणारा होता... बाहेर अंधार दाटून आला होता..आम्ही सर्वच पेंगत होतो.. अधूनमधून डोळा उघडला की बसच्या हेडलाईटच्या प्रकाशात फक्त रस्ता दिसत होता...
मुक्कामाच्या ठिकाणी पोहोचायला आम्हाला रात्रीचे आठ वाजले. ते ठिकाण जुन्या धाटणीचे, कौलारू संकुल होते... आमच्या अगोदर तिथे एक दुसऱ्या शाळेची बस पोहोचलेली होती... आम्ही हात-पाय धुवून घेतले... तिथेही आमची आणि दुसऱ्या शाळेच्या मुलांची
दंगा-मस्ती सुरूच होती... जेवणाची तयारी झाल्यावर साधारण दहाच्या सुमारास आमची जेवणे आटोपली... शिक्षिकेने आम्हा मुलींना एकत्र केले आणि आमच्या बॅगा ठेवलेल्या मोठ्या खोलीकडे नेले... शिक्षिका देखील आमच्या सोबतच झोपायला होत्या, त्यामुळे भीतीचे काही कारण नव्हते... दिवसभरच्या प्रवासाने सर्वजण खूप थकले होते... दिवे मालवताच काही वेळातच खोलीत सामसूम झाली...
महाबळेश्वर आणि प्रतापगड दिवसभर फिरून थकलेलो आम्ही रात्री गाढ झोपलो होतो... पण खरी भीती तर आता अंधाराच्या कुशीतून बाहेर येणार होती....
शांततेचा तो भेदक आवाज...
मध्यरात्री कधीतरी अचानक माझी झोप मोडली... खोलीत मृत्यूसारखी शांतता पसरली होती, फक्त मुलींच्या संथ श्वासोच्छवासाचा आवाज त्या शांततेला छेदत होता... पण त्या आवाजा व्यतिरिक्त मला काहीतरी वेगळे ऐकू आले... काळजाचा ठोका चुकवणारा एक क्षीण आवाज..
कुणीतरी हुंदके देऊन रडत होते!
मी दचकून उठून बसले, खोलीत नजर फिरवली, तर आमच्या मॅडम आणि सर्व मुली कुंभकर्णासारख्या गाढ झोपेत होत्या...
मी कान देऊन पुन्हा तो आवाज टिपण्याचा प्रयत्न केला.. तो आवाज खोलीच्या मागच्या भागातून येत होता... एका लहान मुलीचा मनाला आर्त साद घालणारा तो रडण्याचा आवाज होता... मनात विचार आला, 'कदाचित दुसऱ्या शाळेची एखादी मुलगी बाहेर गेली असेल आणि अंधाराला घाबरून रडत असेल.' याच काळजीपोटी, भीतीवर धीर मिळवत मी कोणालाही न उठवता पाऊल न वाजवता मागचा दरवाजा उघडला...
समोर माथ्यावर आलेल्या पौर्णिमेच्या चंद्राचा पांढरा शुभ्र प्रकाश पसरला होता... त्या उजेडात समोरचे दृश्य स्पष्ट दिसत होते, पण ते दृश्य पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला... साधारण पन्नास फूट अंतरावर एक गोलाकार दगडी कट्टा होता...
त्या कट्ट्यावर शाळेचा गणवेश घातलेली एक मुलगी पाय खाली सोडून, खाली मान घालून बसली होती... तिचे शरीर रडण्याने लटलट कापत होते, आणि तिच्या हुंदक्यांचा आवाज त्या रात्रीच्या शांततेत अधिकच भीषण वाटत होता... मान खाली वाकवलेली असल्यामुळे तिच्या चेहऱ्यावर विखुरलेल्या केसांच्या बटा वाऱ्यावर उडत होत्या...
"अगं ए, तू कोण आहेस? इथे एकटी काय करतेयस?" माझा थरथरणारा आवाज त्या शांततेत घुमला...
माझा आवाज कानावर पडताच, त्या मुलीचे हुंदके थांबले... जणू काळाचे चक्रच क्षणभर थांबले होते... आजूबाजूचा वारा अचानक स्तब्ध झाला, झाडांच्या पानांची सळसळ थांबली आणि त्या मुलीने हळूहळू आपली मान वर करायला सुरुवात केली... तिची हालचाल एखाद्या यंत्रासारखी संथ आणि भयावह होती...
ठीक त्याच क्षणी, काहीतरी जड वस्तू पाण्यात पडल्याचा मोठा आवाज झाला! तो आवाज इतका अनपेक्षित आणि भीषण होता की भीतीने माझ्या काळजाचा ठोका चुकला... मी किंचाळणार होते, पण भीतीने माझा आवाजच फुटला नाही... मी डोळे घट्ट मिटून घेतले आणि स्वतःला सावरण्याचा प्रयत्न केला...
काही सेकंदांनी जेव्हा मी धाडस करून डोळे उघडले, तेव्हा समोरचे दृश्य पाहून माझ्या मेंदूची नस सुन्न झाली... समोरचा तो दगडी कट्टा आता रिकामा होता! ती मुलगी तिथे नव्हती... मी आजूबाजूला नजर फिरवली, पण सगळीकडे सामसूम होती... फक्त चंद्राचा तो थंड प्रकाश जमिनीवर सांडला होता... जणू ती मुलगी हवेत विरून गेली होती...
पण भीती संपली नव्हती... त्या मुलीच्या रडण्याचा तो क्षीण, कासावीस करणारा आवाज अजूनही येत होता... आणि सर्वात धक्कादायक गोष्ट म्हणजे, तो आवाज त्याच कट्ट्याकडून येत होता!
मी थरथरत्या पावलांनी, ओढल्यासारखी त्या कट्ट्याजवळ पोहोचले... तिथे पोहोचताच माझ्या पायाखालची जमीनच सरकली... तो साधा कट्टा नव्हता, तर ते एका अत्यंत जुन्या, शेवाळलेल्या दगडी विहिरीचे गोलाकार कडे होते! मी विहिरीत वाकून पाहिले, तर समोर फक्त काळोखाचा अथांग डोह होता... ती विहीर इतकी खोल आणि काळीकुट्ट होती की तिचा तळ दिसत नव्हता..
विहिरीच्या त्या अथांग आणि काळ्याशार डोहातून ती आर्त हाक, ते मन हेलावणारे हुंदके ऐकू येत होते....
मी थरथरत्या हातांनी विहिरीच्या काठाला पकडले आणि खाली वाकून पाहिले.. विहिरीतील पाणी शिशासारखे संथ होते... पौर्णिमेचा चंद्र डोक्यावर असताना त्याचे प्रतिबिंब पाण्यात स्पष्ट दिसायला हवे होते, पण जेव्हा मी पाण्यात पाहिले, तेव्हा माझे सर्वांग थरथरले.. त्या पाण्यात चंद्राचे प्रतिबिंब नव्हते!
पाण्याच्या खोल थरातून हळूहळू एक आकृती विहिरीच्या भिंतीवर एखाद्या कोळ्यासारखी चालत वर येऊ लागली... ती एक मुलगी होती, पण तिचे रूप काळजाचा ठोका चुकवणारे होते. तिचे डोळे पूर्णपणे पांढरे पडले होते, त्यात बाहुल्यांचा मागमूसही नव्हता... तिचे लांब, काळेभोर केस पाण्यात एखाद्या विषारी काळ्या सापासारखे वळवळत होते... तिने माझ्यावर नजर रोखली आणि तिचे ते पांढरे डोळे थेट माझ्या डोळ्यांत भिडले... तिच्या फाटलेल्या ओठांवर एक असे अमानवी हास्य उमटले, ज्याने माझ्या शरीरातील रक्ताचे जणू बर्फ झाले!
आणि मग, अगदी माझ्या कानापाशी, कोणाचा तरी श्वास जाणवला... एक बर्फासारखा थंड, चिरका आवाज कुजबुजला..
“खूप वर्षापासून मी इथे एकटीच आहे.. माझाशी खेळायला इथे कोणीच नाही ग... तू येतेस का माझ्याबरोबर खाली?”
मी दहशतीने मागे सरकण्याचा प्रयत्न केला, पण माझे पाय जणू जमिनीने चिकटले होते... मी ओरडण्यासाठी तोंड उघडले, पण घशात कोरड पडली होती आणि आवाज जणू कुणीतरी दाबून धरला होता...
मी अत्यंत भयाने पुन्हा विहिरीत बघितले... आत ती मुलगी कुठेच नव्हती.. मनाने एक निःश्वास सोडला..
आणि अचानक, विहिरीचे ते निळसर पाणी रक्तासारख्या गडद लाल रंगात बदलू लागले... त्या रक्ताच्या थराखालून एक हात बाहेर आला...
तो हात नव्हता, तर कुजलेले मांस लटकणारा एक हाडांचा सांगाडा होता! तो हाडांचा पंजा नखांनी हवा फाडत माझ्या दिशेने झेपावला.. क्षणार्धात त्याची पकड माझ्या मनगटावर बसली..
"ये ना... खूप मजा येईल खाली... आपण खूप खूप खेळू.." तो आवाज आता कानात नाही, तर माझ्या मेंदूच्या आत एखाद्या किंचाळीसारखा घुमत होता...
मृत्यू समोर उभा असल्याचे पाहून मी माझ्या अस्तित्वाची सर्व शक्ती एकवटली आणि एक काळजाला पीळ पाडणारी किंकाळी फोडली!
त्याच क्षणी, कोणाच्या तरी स्पर्शाने मी जोरात हादरले...
"काय झालं? का ओरडतेस?" मॅडमचा काळजीत पडलेला आवाज माझ्या कानावर पडला...
मी डोळे उघडले, तर मी खोलीतच होते. भोवती सर्व मुली घाबरलेल्या अवस्थेत माझ्याकडे पाहत होत्या... मी घामाघूम झाले होते, माझे हृदय छाती फोडून बाहेर येईल इतक्या वेगाने धडधडत होते...
"मॅडम... बाहेर मागच्या अंगणात ती... ती मुलगी... ती विहीर..." मी धापा टाकत कसेबसे शब्द बाहेर काढले.
मॅडमनी माझ्या डोक्यावरून हात फिरवला आणि मायेने म्हणाल्या, "अगं वेडे, स्वप्न पडलं असेल तुला! मागे कुठे आलीये कोणती मुलगी आणि विहीर? शांत हो, हे बघ बाहेर फक्त बाग आहे." त्यांनी मागच्या बाजूच्या खिडकीचा पडदा बाजूला केला...
बाहेर खरेच चंद्रप्रकाशात न्हालेली एक साधी, शांत बाग दिसत होती... तिथे ना तो कट्टा होता, ना ती विहीर. मी सुटकेचा निश्वास सोडला...
'कदाचित प्रवासाच्या थकव्यामुळे मनाचा तो खेळ असावा', असे स्वतःला समजावत मी पुन्हा डोळे मिटले.. पण त्या उरलेल्या रात्री मला क्षणभरही झोप लागली नाही...
दुसऱ्या दिवशी सूर्यप्रकाशात सर्व काही बदलले होते... रात्रीची ती भीती आता धुक्यासारखी विरली होती... आम्ही सर्वजण बसमध्ये चढलो आणि बस मुरूड च्या दिशेने चालू लागली... इमारतीला विळखा घालताना मी सहज मागे वळून त्या जागेकडे पाहिले...
तिथे फक्त काही फुलांची झाडे आणि हिरवेगार गवत डोलत होते...
'खरंच तो भास होता' असे म्हणून मी स्वतःशीच हसले, पण तेव्हाच बस गेट जवळ क्षणभर थांबली...
माझे लक्ष तिथे असलेल्या एका जुन्या, गंजलेल्या आणि धुळीने माखलेल्या माहिती फलकाकडे गेले.. रात्री अंधारात आल्यामुळे तो फलक आमच्या वाचण्यात आला नव्हता... त्यावरील अक्षरे वाचताच माझ्या अंगातून एक थंड लहर आरपार गेली...
त्यावर लिहिले होते...
"सावधान! सन १९८० मध्ये इमारतीच्या मागच्या परिसरातील एका खोल विहिरीत पडून एका शाळकरी मुलीचा करुण अंत झाला होता. त्यानंतर सुरक्षेसाठी ती विहीर दगड-मातीने बुजवून त्यावर बाग तयार करण्यात आली आहे... कृपया कोणीही रात्री मागील भागात फिरू नये."
वाचताच माझ्या काळजाचा ठोका चुकला...
माझ्या उजव्या मनगटावर अचानक एक विचित्र जडपणा जाणवला…
क्षणातच तिथे चिखलाने माखलेल्या एका लहानशा हाताच्या पाच बोटांचे गडद निळसर ठसे उमटले....
ते ठसे इतके स्पष्ट होते की, जणू कुणीतरी आत्ताच माझा हात घट्ट पकडून सोडला होता....
त्या थंडगार स्पर्शाने माझ्या अंगावर काटा आला… श्वास क्षणभर अडखळला…
आणि डोळ्यांसमोर अंधार दाटून आला… पण ज्या वेगाने ते ठसे उमटले होते, त्याच वेगाने.. अगदी एका श्वासाच्या आत..
ते हळूहळू विरघळत गेले…
आणि पुढच्याच क्षणी,
माझ्या मनगटावर काहीच नव्हते…
जणू काही ते सगळे… फक्त मला सत्य काय होते ते दाखवण्यासाठीच घडले होते..
त्याच क्षणात, बसच्या इंजिनच्या आवाजात मला तोच चिरका, अमानवी आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू आला..
"आज वाचलीस... पण विसरू नकोस, आपला खेळ अजून संपलेला नाही. पुढच्या वेळी नक्की खेळूया..."
बाहेर लख्ख सूर्यप्रकाश होता, पण माझ्या मनात मात्र त्या काळोख्या विहिरीचे अथांग भय कायमचे घर करून बसणार होते...
समाप्त...
©® लेखक: रूद्रदमन
8265077252

0 comments:
Post a Comment